जुन्या काळातील लग्न

Analysis News

लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की.

लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय.
लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही…. कालाय तस्म..

“आली ईईईईई लग्नघटी समीप नवरा” … अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा …. असे बामन म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे … जेणेकरून “तदेव लग्नम सुजनम तदेव.. ताराबलम चंद्रबलम” ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे …. पहिली पंगत !
गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो । (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट) या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत … आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते, अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत.

पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशीबशी पत्रावळ सेट केली, तर वारा येई आणि ही बया इकडेतिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या, की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. याना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असत, दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई.

मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिनडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जाई.
वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांगं उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वग्राळे तर्रर्रर्ररीसकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.

काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो…. एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो.. त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर गम्मत नका विचारू…
शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा “वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे” ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी.

बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतुन पळूनही जाई..
काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते, तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठठल बने….

बाराचे लग्न अडीच ला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे…

पहाटे ५ वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत….. येताना खिशात लपवलेला प्लास्टीकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा…
२-५ रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास..

टीप: आपल्या सारख्या नव्या-जुन्या पिढीने….. हे सगळं अनुभवणं कदाचीत राहूनच गेलं… असेल…. किमान नवीन पीढ़ीला सेंड करा…. वारसा, वहीवाट, चालीरीती, इतिहास जिवंत राहील.!

0 Comments

No Comment.