जळगाव भाजपमध्ये भूकंप, महापालिका हातची जाणार

Analysis News

भाजपच्या ताब्यात असलेल्या महापालिका हिसकायच्या…  महाआघाडीने ठरवलेले दिसते.  गेल्या महिन्यात    जयंत पाटलांनी  सांगली हिसकली.   चंद्रकांतदादा यांच्या प्रतिष्ठेची  ही महापालिका.  राष्ट्रवादीने गेम करून  खिशात टाकली.  भाजपचेच नगरसेवक फोडले.  आता जळगाव महापालिका   गेल्यात जमा आहे. ‘तुम्ही इडी लावाल  तर मी सीडी लावेन’ असे  नाथाभाऊ खडसे भाजप सोडताना  म्हणाले होते.  त्यांना सीडीचीही गरज पडली नाही. सत्ता बदलली.  हवा बदलली. सत्तेच्या लोभाने  भाजपमध्ये गेलेले   लोक     स्वगृही  परतत  आहेत.    भाजप रिकामा होतोय.  

                   जळगाव महापालिकेत भाजपचे बहुमत आहे.  तिथल्या महापौराचा अडीच वर्षाचा कार्यकाळ  येत्या १७ मार्चला  संपतो  आहे.   १८ तारखेला  नव्या महापौराची निवडणूक आहे.  त्या तारखेआधीच  खडसेंनी भूकंप  घडवून आणला.  त्या संबंधात   माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज  पक्षाची बैठक बोलावली होती. पण  भाजपच्या एकूण ५७ नगरसेवकांपैकी  २७ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत.   कशाला येतील?  पक्षाचा व्हीप निघण्याआधीच ते   उडण छू झाले आहेत.    ते सारे सहलीवर गेल्याचे  सांगण्यात येते.  महाजनांना याची हवाही नव्हती.   नाथाभाऊ म्हणाले, आमचे ठरले आहे.  शिवसेनेचा महापौर आणि  राष्ट्रवादीचा  उपमहापौर.

       शरद पवारांचे बोट पकडून  खडसे राष्ट्रवादीत आले खरे. पण  पवारांनी  त्यांची अजून काही सोय लावलेली नाही.  कशी लावतील?   तिथे आधीच नेत्यांची भरमार आहे.   त्यात खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला   साजेसेच पद द्यावे लागेल.   ते द्यायचे तर  सध्याच्या एखाद्या मंत्र्याला   हलवावे लागेल.     सध्यातरी खडसे  प्रतीक्षा यादीवर आहेत.

0 Comments

No Comment.