आमिर खानने घेतला सोशल मिडिया संन्यास

Analysis News
Spread the love

वाढदिवसाला  एखादी वाईट गोष्ट  सोडून देण्याची पद्धत आपल्याकडे आहे.  कोणी दारू सोडतो, कुणी जुगार सोडतो.  लोकप्रिय  चित्रपट अभिनेता आमिर खान याने चक्क  सोशल मिडिया सोडला.  त्याचा सोशल मिडीयाचा  संन्यास  प्रचंड गाजतो आहे.  १४ मार्चला आमिर ५६ वर्षाचा झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपली अखेरची पण तिरकस पोस्ट टाकली.  ‘मी खूप सक्रीय आहे, हा देखावा बंद करण्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे’ असे त्याने म्हटले आहे.  नेमकी काय भानगड आहे?  त्याला  प्रायव्हसी हवी होती की आणखी काही?

         खासगी जीवन टिकवायचे असेल तर  मोबाईल, इंटरनेट न वापरणे इतकंच आपल्या हातात आहे.  पण या युगात  ते न वापरता जगण्याची कल्पनाच  शक्य नाही.   आमिरला तर  ३६ लाख  चाहत्यांचे फॉलोइंग आहे.  ट्विटर, इंस्टाग्रामवर अक्षरशः लाखो फॉलोअर्स आहेत.  ह्या सर्वाना त्याने सोडचिठ्ठी दिली. ते कधी त्याला डोक्यावर घेत तर कधी ट्रोल करत.  तरीही नटनट्याना ते हवेसे असतात.   पण चाहते छळू लागले तर  ताणतणाव वाढतो.   मानसिक आरोग्य  बिघडते.  सोशल मीडियात  स्वतःला जागा नसते. मग  आमिरच्या बाबतीत असे काही  झाले आहे काय?

               दूर अंतरावरून संपर्क, संवाद साधण्याचे यंत्र म्हणून १५० वर्षापूर्वी टेलिफोनचा  जन्म झाला.    २५ वर्षापूर्वी इंटरनेट  भारतात आला.  पुढे स्मार्टफोनने तर आपली जीवनशैलीच बदलून टाकली.  स्मार्टफोनचे  काही फायदेही असतील. पण ‘है भीड इतनी, फिर भी अकेला’ अशी  अवस्था आहे.  मोबाईलमुळे   जग लहान झालं, मुठीत आलं. पण व्यक्ती-व्यक्तीमधील अंतर वाढलं.   लोक मोबाईलच्या आहारी गेले आहेत. पूर्वी माणसे कशी अघळपघळ असायची. ओळख नसताना ओळख काढायची.  मोबाईल काय आला.  लोक एकमेकांशी बोलणे विसरले.  सामान्य माणूस  दररोज सरासरी दोन ते तीन तास मोबाईल पाहतो.  ‘डोन्ट कॉल. ओन्ली व्हाटस अप.’  घरातल्या घरात  एकमेकांना मेसेज  पाठवले जातात.  लहान मुले आपल्या आईला विचारू लागली आहेत, ‘मम्मा, तू  मला कुठल्या साईटवरून डाऊनलोड केले होते?’ पूर्वी घराघरात गप्पांचे फड रंगायचे.  आता गप्पा मारणे हे प्रकारच  संपला.   पाहावा तो मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेले दिसतो.  आपल्या हाती मोबाईल देण्यामागे  शास्त्रज्ञांचा हेतू चांगला होता.  पण मोबाईलच्या आहारी   जाताना आपण आपले स्वातंत्र्य, आपले  जगणे  गमावून बसलो नाही ना?  अस्वस्थ करणारे हे प्रश्न आहेत. आमिर खानने तर निर्णय केला. तुमचा काय विचार आहे? मोबाईलशिवाय जगता येईल?

 185 Total Likes and Views

0 Comments

No Comment.