MNC जळगावमध्येही भाजपला धक्का, महापालिका हातची गेली

Editorial News

भाजपला सध्या राज्यात  ‘बुरे दिन’ सुरु आहेत.  राज्यातली  सत्ता गेल्याला सव्वा वर्ष होत आले आहे.  आता  महापालिकाही हातातून निसटत आहेत.  फोडाफोडीत भाजपचा हात कुणी पकडू शकत नाही. पण आता नगरसेवकही फुटू लागले आहेत.  गेल्या महिन्यात   राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी  सांगली महापालिकेत भाजपचा ‘कार्यक्रम’ केला. आज  जळगाव महापलिकेत  शिवसेनेने   भाजपला दणका  दिला. 

             जुन्या  महापौराचा  अडीच वर्षाचा कार्यकाळ  संपल्याने नव्या महापौरासाठी आज  निवडणूक घेण्यात आली.   तसे पाहिले तर  या महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. पण  भाजपचे तब्बल  २७ नगरसेवक फुटले.  एमआयएमचे तीन नगरसेवकही  शिवसेनेच्या बाजूने गेले.  शिवसेनेच्या जयश्री महाजन  महापौर बनल्या.

                      भाजपला दणका देण्यासाठी   एकनाथ खडसे मुहूर्ताची वाट पाहत होते.  भाजपने त्यांना सायडिंगला  टाकल्याने  त्यांनी राष्ट्रवादी जवळ केली.  त्यामुळे  माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोकळे रान मिळाले होते.  महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात.  पण आज तेच संकटात आले आहेत.  तीन वर्षापूर्वी फोडाफोडी करून  महापालिका खिशात टाकणारे  गिरीश महाजन   यांना हा मोठा धक्का आहे. आपले नगरसेवक फुटतील असे त्यांनी स्वप्नातही  कल्पिले नसेल.  अलीकडे साऱ्यांनाच  सत्तेची मस्ती चढली आहे.  मग जळगाव त्याला अपवाद कसे असेल?   जळगावला महाजन आपली जहागीर समजू लागल्याने नगरसेवक  बिथरू लागले होते.  पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी फेकलेल्या जाळ्यात   असंतुष्ट नगरसेवक अडकले आणि भूकंप झाला.  गिरीश महाजनांना  कळले तेव्हा उशीर झाला होता. सांगली, जळगाव नंतर आता कुणाचा नंबर लागतो याची खमंग चर्चा  आहे.

0 Comments

No Comment.