उद्धव सरकारचा गेम होणार?

Editorial News
Spread the love

सरकार बनवायला आमदारांचे बहुमत लागते. पण सरकार चालवायला अधिकाऱ्यांचे  बहुमत लागते. महाराष्ट्रात सध्या हेच पाहायला मिळते आहे.  अधिकाऱ्यांकडून मिळवलेली माहिती घेऊन  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  फटाके फोडत आहेत. आमदार फोडता येत नाहीत म्हणून भाजपने   अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. परमबीर सिंग  आणि रश्मी शुक्ला  भाजपच्या मदतीला आलेले दिसतात.  दोन महिन्यापासून  सत्ताधारी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.   नळावर बायका भांडतात तशी भांडणे सुरु आहेत. जे काही सुरु आहे ते शुध्द राजकारण आहे. आणि त्यात  सामान्य माणसाचे मरण आहे.

           परमबीर यांच्या स्फोटक पत्रावरून  राजकारण पेटले आहे. पोलिसांच्या बदल्या-बढत्यांमधील  घोटाळ्याचा पत्रव्यवहार केंद्रीय गृह सचिवाला देऊन  फडणवीस यांनी तर बॉम्ब टाकला. बचाव करताना  शरद पवार, संजय राऊत यांची दमछाक सुरु आहे. तिकडे  परमबीर सिंग  कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत. त्यांनी कोर्टात  गृहमंत्री  अनिल देशमुख यांना पार्टी केले तर पुन्हा गोंधळ. या लठ्ठालठ्ठीत खरे नुकसान  उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यांच्या इमेजला  धक्के बसत आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर  परमबीर यांना केव्हाच सस्पेंड केले असते. मात्र ठाकरे  गप्प आहेत. बोलण्यासाठी आहे तरी काय? बोलले तर प्रॉब्लेम वाढतील. ठाकरेही पस्तावत असतील. कसल्या  मंत्र्यांना घेऊन  आपण सरकार बनवले?

       फडणवीस आणि भाजपचे नेते आज राज्यपाल कोश्यारी यांना  भेटले.   ह्या सरकारची १०० पापं सांगितली.  काय होणार? राष्ट्रपती राजवट येणार?  ४० वर्षापूर्वी  ह्याच कारणाने  शरद पवार यांचे पुलोद सरकार  बरखास्त झाले होते. तेव्हा राज्यपाल होते सादिक अली. तेव्हा इंदिरा गांधी होत्या. आज  नरेंद्र मोदी आहेत. कोश्यारी यांनी उद्धव यांना अहवाल मागितला तर पहिली घंटा वाजलीच समजा.  अमित शहा तर वाट  पाहत आहेत.  कोश्यारी तर  तलवारीला धार लावून बसले आहेत. पण एक सांगू का? जे काही व्हायचे ते व्हायचे असेल तर ते बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर होईल.  म्हणजे मे महिन्यात.  ममता हरल्या तर  उद्धव सरकारचे ‘बुरे दिन’  सुरु होतील.  हे सरकार बुडवले तर  ६ महिन्यात  निवडणुका घ्यायच्या  आहेत.   देवेंद्र किती आमदार  निवडून आणू शकतात? मोदींना त्याचे टेन्शन आहे. कारण आता मोदींची  लाट नाही. करोनाची आहे.

 228 Total Likes and Views

0 Comments

No Comment.