एक ते दीड वर्ष मास्क घालायचाच आहे

Editorial News

             करोना नेहमीसाठी पाहुणा बनून आला आहे.  प्रत्येकाला हे जाणवत होते. तरीही वैताग  होता. केव्हा जाणार करोना?  केव्हा मरणार करोना?   केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे  कोडे थोडे उलगडले.   ‘एक ते दीड वर्ष    मास्क तर घालायचाच आहे’ असे जावडेकर म्हणाले.    सुरक्षित अंतर राखायचे आहे,  हात  धुण्याची सवयही ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.  म्हणजे आणखी किमान दीड वर्ष   कमीजास्त प्रमाणात  लॉकडाउन  चालू राहणार आहे.  या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी आतापासून  करायला हवी.  सरकारही काय करणार? लोक ऐकायला तयार नाहीत.  गर्दी  कमी होत नाही. पगार  महिन्याच्या  १० तारखेपर्यंत होतात.   बहुतेक खरेदी  पहिल्या १० दिवसात होते. व्हायला पाहिजे. मग  इतर २० दिवसात गर्दी   दिसते कशी?  लोकांनी खरेदीची मानसिकता बदलायला पाहिजे.

      जावडेकरांनी एक चांगली बातमी दिली.  येत्या एक एप्रिलपासून   ४५ वर्षापेक्षा अधिक वय  असणाऱ्या  सर्वांना  करोनाची लस  दिली जाणार आहे.  लसीकरणाचा हा चवथा टप्पा असेल.  देशात आतापर्यंत ४ कोटी ७२ लाख  लोकांना लस टोचली आहे.  रोज सुमारे २० लाख लोकांना लस  टोचली जाते.  अर्थात ह्या वेगाने आपण करोनाला आपण कसे हरवू हाही प्रश्नच आहे.  लसीकरणाचा वेग  वाढायला हवा.  लसीकरणानंतरही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याला वेगळी कारणे असतील. करोनाचा विषाणू  वेगवेगळ्या रुपात येतो आहे.  त्याच्याशी लढण्यासाठी  अजून औषध  आलेले नाही. आपल्याकडे  लस हेच एक सुरक्षाकवच आहे.  त्यामुळे शंका न घेता लोकांनी लस टोचून घ्यायला हवी.

              आता लसीकरणाच्या   नियोजनातही   नवनवे बदल केले जात असल्याने लोकांचा गोंधळ वाढतो  आहे.  कोव्हीशिल्डची दुसरी लस  २८ दिवसाने घ्यायची असते, पण आता ६ ते ८ आठवड्याच्या  अंतराने घ्यायची आहे.  दोन लशीत जास्त अंतर  ठेवले तर  अधिक संरक्षण मिळते असे  आता सांगण्यात येत आहे.  निर्णय चांगला आहे. पण तो लोकांपर्यंत पोचवण्याचे आव्हान  यंत्रणेपुढे असेल.

0 Comments

No Comment.