अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला सावरले आहे. शरद पवारांनी झटपट निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे सोमवारी सकाळी शपथ घेतील. त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार बनवायचा निर्णय झाला तेव्हाही गृह खाते कोणाला द्यायचे हा प्रश्न पवारांकडे होता. त्यांची पहिली पसंती दिलीप वळसे-पाटील हीच होती. पण तब्येतीच्या कारणाने ते होऊ शकले नाही. तो योग आता आला.
६४ वर्षे वयाचे दिलीप वळसे-पाटील हे नाव महाराष्ट्राला नवे नाही. गेली ६ टर्म ते पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव ह्या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील हे शरद पवारांचे पक्के मित्र. पवारांचे पी.ए. म्हणून दिलीपरावांनी करिअरला सुरुवात केली. त्यांच्यातले नेतृत्वगुण पवारांनी हेरले. १९९० मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. आणि मग मागे वळून पहिले नाही. सर्वसमावेशक नेता म्हणून वळसे पाटलांकडे पाहिले जाते. त्यामुळे विरोधी पक्षातही त्यांना मान्यता आहे. वित्त, ऊर्जा अशी महत्वाची खाती त्यांनी सांभाळली. विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. अनिल देशमुखांच्या रूपाने गृह खाते विदर्भाच्या हातून गेले खरे. पण दिलीप वळसे-पाटील यांची सासुरवाडी विदर्भातली आहे. म्हणजे विदर्भाचे फार नुकसान नाही. गृहमंत्र्याला वलय, सत्ता असते. तरी ते खाते अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे अनेकांसाठी काटेरी मुकुट ठरले. वादग्रस्त ठरलेल्या गृह खात्याला त्याचे जुने वैभव परत मिळवून देताना दिलीप वळसे-पाटील यांची कसोटी लागणार आहे.