संघाच्या कार्यक्रमाला गेलेला काँग्रेसी

Editorial Politics

कॉन्ग्रेसने काँग्रेसने (Congress) देशाला अनेक राष्ट्रपती दिले. यातल्या काहींनी पक्षीय चौकट सांभाळून या पदाची प्रतिष्ठा वाढवली. अशांमध्ये प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) हे एक होते. चाणक्य राजकारणी म्हणून प्रणवदांची ओळख करून द्यायची की ‘न झालेला सर्वोत्कृष्ट पंतप्रधान’ म्हणून त्यांचे नाव घ्यायचे असा प्रश्न पडतो. राजकारण दिवसेंदिवस घाणेरडे आणि गळेकापू होत चालले आहे.

अशा हवेत प्रणवदांसारखा सुसंस्कृत चेहरा हरवल्याची हुरहुर आहे. काँग्रेस आणि सरकारवर कुठलेही संकट आले तर प्रणवदा मार्ग काढत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपपासून डाव्या पक्षापर्यंत सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. राष्ट्रपती झाल्यावरही काँग्रेसचेच नव्हे तर भाजपचे नेतेही त्यांच्याशी गुफ्तगू करायला राष्ट्रपती भवनात जात. हल्ली सर्वच राजकीय पक्षांना राजकीय विश्वासार्हतेचे मोठे संकट भेडसावत आहे. कुणाचा कुणावर विश्वास नाही. ह्या पार्श्वभूमीवर ह्या बंगाली नेत्याने लोकांचा किती विश्वास कमावला असेल याचा अंदाज यावरून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाकून प्रणवदांच्या पाया पडत असल्याचा जुना फोटो आज पाहिला. हा एकच फोटो प्रणवदा काय चीज होती हे सांगून जातो. प्रणवदा काँग्रेसी होते. पण चापलुसी काँग्रेस कल्चरमधले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दोन वर्षांपूर्वी कार्यक्रमाला नागपुरात बोलावले तेव्हा त्यांनी ते बिनधास्त स्वीकारले. संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला. पण प्रणवदा गेले आणि खरा राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वयंसेवकांना सांगून आले. हेडगेवार गुरुजी भारतमातेचे थोर सुपुत्र होते असे तिथल्या डायरीत लिहून आले.

एवढे करायला नीतिबळ लागते. प्रणवदांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आपण म्हणतो ती ह्या अर्थाने. साऱ्या क्षमता असतानाही काँग्रेसचा हा संकटमोचक पंतप्रधान होऊ शकला नाही. ४२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एक-दोन नव्हे तर तीन-तीन संधी येऊनही प्रणवदा यांना नशिबाने हुलकावणी दिली. तसे पाहिले तर इंदिरा गांधी यांनीच १९६९ मध्ये त्यांना राजकारणात आणले, त्यांच्यातील कौशल्य पाहून त्यांना ‘लिफ्ट’ दिली. १९८४ मध्ये इंदिराजींची हत्या झाली तेव्हा प्रणवदा देशाचे अर्थमंत्री होते. परंपरेनुसार ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांनाच राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग बोलावतील अशी चर्चा होती. पण ऐनवेळी राजीव गांधींचे नाव पुढे आले. इंदिराजी गेल्यानंतर प्रणवदा सायडिंगला पडले.

त्या अस्वस्थतेतून १९८६ मध्ये त्यांनी वेगळा पक्षही काढला. पण लवकरच ते स्वगृही परतले. कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी पुन्हा पक्षात व सरकारमध्ये आपले स्थान निर्माण केले. ते हुजरे नव्हते. सोनिया गांधी यांच्याशी विशेष ट्युनिंग जुळत नसतानाही सोनियांना प्रणवदांना टाळता येत नसे. शेवटी राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देऊन सोनियांनी सारी कसर भरून काढली. पण योग्य वेळी प्रणवदांना पंतप्रधानपद मिळाले असते तर आज देश कुठे असता हा गांधी परिवारासाठी नक्कीच आत्मचिंतनाचा विषय आहे.

Moreshwar Badge :- Editor-in-Chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

0 Comments

No Comment.