अवघ्या २० वर्षांच्या राजकीय आयुष्यात मोठी वादळं अंगावर झेलत आलेल्या नाना पटोले यांना नव्या सत्तास्थापनेत विधानसभा अध्यक्षपद देतील असे कुणालाही वाटले नव्हते. ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद मिळेल असे वाटले होते’ असे खुद्द विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत केलेल्या भाषणात म्हटले. खरेच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ह्या खुर्चीसाठी ठरले होते. पण राष्ट्रवादीला पृथ्वीराजबाबा चालत नव्हते, त्यामुळे वांधा आला. पण मैदानातल्या ह्या नेत्याला सभागृह सांभाळायला सांगून काँग्रेसश्रेष्ठींनी प्रस्थापितांना तर धक्का दिलाच; पण एका अर्थाने पटोले यांचेही पंख कापले आहेत. एका कानाने ऐकू येत नसतानाही हरिभाऊ बागडे यांनी पूर्ण पाच वर्षे विधानसभा चालवली. आता दोन्ही कान २४ तास टवकारून असलेले ५७ वर्षे वयाचे नाना खुर्चीवर बसतील तेव्हा विधानसभा किती तापलेली असेल याचा अंदाज बांधायला अनेकांनी सुरुवात केली आहे.
पटोले आतापर्यंत तीनदा काँग्रेसकडून तर एकदा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. भंडारा-गोंदियामधून भाजपकडून २०१४ मध्ये हेवीवेट प्रफुल्ल पटेल यांना हरवून लोकसभेवर गेले. शेतकरी आंदोलनांमधून त्यांचे नेतृत्व घडत गेले.१९९९ मध्ये ते पहिल्यांदा ते काँग्रेसकडून आमदार झाले आणि मग मागे वळून पाहिले नाही. नाना पटोले यांचा पिंडच मुळी संघर्षाचा आहे. कुणी पक्ष त्यांना फार काळ बांधून ठेवू शकलेला नाही. २००८ साली शेतकरी प्रश्नावर त्यांनी काँग्रेस सोडली तर अलीकडे दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी पंगा घेतला. नागपुरातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढायला कुणी तयार नव्हते तेव्हा नानांनी टक्कर दिली. पडले. पण नानाचे एक खास आहे. लढायला, झुंजायला त्यांना आवडते. लढायचे विसरल्याने काँग्रेसला वाईट दिवस आले. मात्र आक्रमण हा नानांचा ‘डीएनए’ आहे. त्यातून ते सोनिया, राहुल यांच्या नजरेत भरले. आताही साकोलीमधून ते निवडून आले तेंही ताणतणावातच. अन्याय कानावर आला तर नाना धावून गेल्याची उदाहरणे आहेत. सत्तेच्या नव्या समीकरणात नाना स्वतःला कसे सांभाळून घेतात त्याची चर्चा आहे.
विधानसभा अध्यक्षपद हे फार मोठे जबाबदारीचे आणि सन्मानाचे पद आहे. १९७२ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी हे पद भूषवले होते. त्या नंतर पहिल्यांदाच विदर्भाला हे पद मिळाले आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात विदर्भाला झुकते माप होते. सत्तेच्या नव्या समीकरणात विदर्भाकडे दुर्लक्ष होईल अशी भीती होती. पण नागपूरचे नितीन राऊत यांचा शपथविधी झाला आणि आता नाना अध्यक्ष बनले. त्यांची ‘नानागिरी’ कशी रंगते त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.