वो राम कहां से लाऊ… रंजन गोगोईजी

Analysis

‘रावण के कितने हाथ मै काटू,  कितनी मै लंकाए  जलाऊ, नर नर रावण, इतने  राम कहां से लाऊ’ अशी एक कविता आहे.  देशाला स्वातंत्र्य मिळून ७० पेक्षा अधिक वर्षे उलटली.  स्वातंत्र्यात तुम्ही सुखी  व्हाल, जमीन, आकाश, जंगल सारे काही तुमचे असेल असे सांगून शहीद फासावर गेले. पण इतके वर्ष होऊनही   समस्या संपलेल्या नाहीत. दिवसेंदिवस जगणे अवघड होत चालले आहे. पेट्रोल, सिलेंडरच नव्हे तर न्यायही  महाग  झाला. फक्त माणूस स्वस्त होत आहे. राजकारणी स्वप्न विकतात. व्यवस्थेला शह देणे शक्य नाही अशी निराशाच सामन्यांच्या तोंडी येते. नेमकी अशीच काहीशी खदखद  माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे  खासदार रंजन गोगोई   यांनी व्यक्त केली आहे. ‘मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही .  तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही’  असे विधान  गोगोई यांनी  दिल्लीमध्ये नुकतेच केले आहे. राफेल वाद,  तीन तलाक, अयोध्या  यासारख्या संवेदनशील  खटल्यांचा  न्यायनिवाडा करणाऱ्या  सरन्यायाधीशाचे हे   विधान  धक्कादायक  आणि तेवढेच चिंताजनक आहे. प्रत्येकाला चिंता करायला लावणारे आहे.   कोर्टात न्याय मिळणार नसेल तर कुठे जायचे?                   

गोगोई हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे.   त्यांच्यावर मागे   लैंगिक छळाचा आरोप झाला होता. त्याचा निवाडा  त्यांनी स्वतःच केला होता असा आरोप तृणमूल कॉन्ग्रेसच्या  खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केला होता.   त्यावर पत्रकारांनी त्यांना  तुम्ही मोईत्रावर  कायदेशीर कारवाई कराल काय?असा प्रश्न केला होता.  या प्रश्नाला  उत्तर देताना   गोगोई यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.  न्यायालयात जाणे म्हणजे स्वतचेच कपडे स्वतःच स्वछ  करण्यासारखे आहे असे त्यांनी म्हटले.  न्यायव्यवस्थेतील सत्य सांगण्याचाच तर त्यांनी प्रयत्न केला नाही ना?  असा अनेकांना प्रश्न पडतो.   न्यायालयाच्या आदेशाने काहीही  थांबलेले नाही. भ्रष्टाचार थांबला नाही,  गुन्हेगारी थांबलेली नाही,  रस्त्यावरील अतिक्रमणे  हटली नाहीत. कोर्टाने आदेश दिला म्हणून   देशात रामराज्य येईल  अशी परिस्थितीही नाही. तरीही लोक कोर्टाकडे आशेने पाहतात. कोर्टाचे कुणी ऐकत नाही तर मग कुणाचे  ऐकतात? बहुधा  रामाचे? दुर्जनांना राम संपवतो. म्हणूनच की काय अयोध्येत  ११०० कोटी रुपये  बांधकाम खर्चाचे भव्य राम मंदिर  बांधणे  सुरु आहे. त्यासाठी  लोकांकडून देणग्या गोळा करणेही सुरु आहे. आतापर्यंत  १५०० कोटी रुपये मिळाले आहेत. पण  मग लोक धर्माचे ऐकतात असे आहे का?  ममता बानेर्जी यांना  रामाच्या नावाची अलेर्जी आहे.  मग आता सांगा. सर्व ऐकतील, सर्वांना चालेल असा राम कुठून आणायचा?

0 Comments

No Comment.