म्हणून वाढला करोना, शरद पवार सोबत असूनही भुजबळांची विकेट

Editorial News

करोना मेला नव्हता, तो जाणारही  नाही.   पुढचे संपूर्ण आयुष्य आपल्याला करोनासोबतच जगायचे आहे. दोन महिन्यापूर्वी  सरकारलाही वाटले. करोना गेला.  हळू हळू   सारे अनलॉक व्हायला लागले. एखादे धरण फुटावे   तसे लोकांचे झाले. आठ-नऊ महिन्याचे भयंकर अनुभव लोक विसरले, बेशिस्त फिरू लागले. आता हाच मोकळेपणा तापदायक ठरतो आहे.  दररोज रुग्णसंख्या भरमसाट वाढते आहे.  गेल्या १० दिवसात महाराष्ट्रात   ४७ हजार  नवे रुग्ण   निघाले.  दररोज यामध्ये  भर पडत आहे.  रुग्ण वाढले म्हणून टेन्शनमध्ये आलेल्या उद्धव सरकारने  कठोर निर्बंधांचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुण्यानंतर  उपराजधानी नागपूर शहरातही  कडक निर्बंध आले आहेत. नागपुरात  शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लास   सात मार्चपर्यंत बंद  राहणार आहेत.  बाजारपेठा शनिवार-रविवारी बंद  राहतील.   मंगल कार्यालये  २५ तारखेपासून  सात मार्चपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.  हॉटेल्स, रेस्टोरंट  रात्री ९ पर्यंत आणि तीही निम्म्या क्षमतेने चालवायची आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. एकूणच लोकांचे मरण आहे.  करोनाने मरा किंवा बेकारीने मरा.

                   ही पाळी का आली?  हे टाळता आले नसते का?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून तो शरद पवारापर्यंत सारे पब्लिकला दोष देत आहेत.  तोंडाला मास्क लावला नाही,  सुरक्षित अंतर पाळले नाही, गर्दी केली म्हणून हे झाले असा त्यांचा निचोड आहे. पण गर्दी रोखायला सरकारला कुणी रोखले होते? अनलॉकनंतरही  सार्वजनिक कार्यक्रमांसाठी बंधने  कायम होती.  मास्क लावला नाही, गर्दी केली म्हणून सरकार आज दंड वसूल करते आहे.  आधी सरकारचे हात कुणी बांधले होते?   पुढाऱ्यांकडच्या लग्नाचे बार  धुमधडाक्यात उडाले. मंत्री धनंजय मुंडे  त्यांच्या गावात गेले तेव्हा अक्षरशः क्रेन  लावून  हार घालण्यात आला.  नाना पटोले यांनी मुंबईत  दणक्यात मिरवणूक काढून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. छगन भुजबळ यांचे ताजे उदाहरण आहे. भुजबळ  नाशिकच्या एक लग्नाला गेले आणि पॉजिटिव्ह निघाले. शरद पवार त्यांच्यासोबत होते. पण म्हणून करोनाने भुजबळांना  सोडले नाही.   प्रशासनाने कुणाला रोखले? कुणाला दंड केला? कुणालाही नाही.  ना  सत्ताधारी पक्षांना  नियमांची फिकीर, ना यंत्रणांना  काळजी.  आज तेच उद्धव ठाकरे  राज्याला दम  देत आहेत. आठ दिवसात केसेस कमी झाल्या नाहीत तर लॉकडाऊन लावतो म्हणून.  लॉक डाऊन हा करोनावरचा एकमेव इलाज नाही हे तीन महिन्यांच्या अनुभवाने दिसून आले. तरीही  प्रत्येक नेत्याच्या तोंडी  लॉकडाऊनची भाषा आहे.

                    एक लक्षात घ्या.  करोनाचा आता आढळणारा  विषाणू  आधीपेक्षा खतरनाक आहे.  सारखा रंगढंग बदलणारा हा व्हायरस आहे. सरकार लस टोचते आहे. पण  ह्या नव्या स्ट्रेनवर  लस कितपत प्रभावी  राहील याची शंका   काही डॉक्टरच  बोलून दाखवत आहेत.  लस टोचलेल्या काहींना पुन्हा करोना  झाल्याचे उदाहरणे  समोर येत आहेत. लसीचे रिझल्ट मिळायला ४५ दिवस लागतात. त्यामुळे गैरसमज नको. लस घ्यायलाच पाहिजे.  दुसरे आहे काय आपल्याजवळ?  विधिमंडळ अधिवेशन तोंडावर आले असताना   आपले मंत्री धडाधड   पॉजिटीव्ह निघत आहेत. कुणा कुणाची चिंता करायची आणि कशी करायची?  शिस्त पाळली तरच करोना हरू शकतो. पण शिस्त कशाशी खातात  हे कोणाला ठाऊक आहे? नेमकी अडचण इथे आहे.

0 Comments

No Comment.