मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी मोकळा संवाद साधला. ते बोलणार म्हणजे पुन्हा लॉकडाऊन लागणार ह्या चिंतेने लोक दहशतीत होते. मुख्यमंत्र्यांनी तसे काही केले नाही. आठ दिवसाचा अल्टीमेटम मात्र दिला. म्हणजे आठ दिवसात करोना कमी झाला नाही तर लॉकडाऊन येऊ शकतो. ठाकरेंनी सबुरी दाखवली. मात्र अमरावतीमध्ये मात्र तिथल्या त्यांच्या पालकमंत्र्याने उद्या सायंकाळपासून एक आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीरही करून टाकला. करोनावरचे औषध म्हणजे लॉकडाऊन अशी मानसिकता होत चालली आहे. मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हे अंतिम उत्तर होऊ शकत नाही. लॉकडाऊनने करोनाचा संसर्ग किती रोखला जातो हे तीन महिन्याच्या अनुभवानंतरही समजले नसेल तर काय बोलावे? मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन नाही, पण बऱ्यापैकी निर्बंध आणले आहेत. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी केली. गर्दीची आंदोलनेही आता करता येणार नाहीत. गरज पडल्यास आणखी कडक निर्बंध लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पण याची अंमलबजावणी होणार कशी? पुन्हा सरकारी बाबू आणि पोलिसांच्या हाती देणार का? आमदार, खासदार आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना कामाला का लावत नाही?
राज्यातील १५ मोठी शहरे रेड अलर्टवर आहेत. करोना वाढतो आहे. तो रोखण्यासाठी हे सारे आवश्यक होते. पण ही परिस्थिती कुणामुळे आली? सारेच पब्लिकला जबाबदार धरत आहेत. लोकांनी चेहऱ्याला मास्क घातला नाही, सुरक्षित अंतर पाळले नाही म्हणून जनतेला व्हिलन ठरवले जात आहे. ‘मीच जबाबदार’ अशी मोहीम चालवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला. लोक बेफिकीरीने वागले असे शरद पवार म्हणाले. खरेही आहे. लोकांचे चुकलेच. पण ज्यांनी इमानदारीने मास्क लावला, अंतर राखले त्या लोकांवर असे बोलणे म्हणजे अन्याय आहे. मंत्री राजेश टोपे, जयंत पाटील यांनी नियम पाळले असतील तर मग ते पॉजिटीव्ह का निघाले? करोनावर अजून औषध सापडलेले नाही. लस आहे. पण लस टोचून घेणारे दोघे मुंबईत पुन्हा पॉजिटिव्ह निघाले आहेत. तेव्हा पॉजिटिव्ह –निगेटिव्ह हा सारा हवेतला खेळ आहे. काहीही करून आपल्याला तो फत्ते करायचा आहे. कारण ही शेवटी विषाणूविरुद्धची लढाई आहे.
लोकांनी गर्दी केली असेल. पण करोनाच्या लढाईत सरकार कमी पडले असे मुख्यमंत्र्यांना अजिबात वाटत नाही का? मास्क घातला नाही, लग्नाला गर्दी केली म्हणून सरकारने आता आता कुठे दंड वसुली सुरु केली. हे आधी का केले नाही? अनलॉक झाला, सारे व्यवहार खुले झाले तरी करोनाचे नियम लागू होते. तरीही लोकांना मोकळे रान का मिळाले? मधल्या काळात प्रशासन ढिले का झाले? राजकीय नेत्यांच्या घरवापसीच्या निमित्ताने ठिकठिकाणी झालेले शक्तीप्रदर्शन तर अंगाचा थरकाप उडवणारे होते. नाना पटोले यांनी मुंबईत मिरवणूक काढली. कुणी परवानगी दिली? मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या गावात गेले तेव्हा त्यांना क्रेन लावून हार घालण्यात आला. मुंडे किंवा त्या गर्दीला काय शिक्षा केली? केवळ लोकांना दोष देऊ नका. मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत सोहळा पुढे ढकलून सामाजिक जाणीवेचा उत्तम आदर्श ठेवला. प्रत्येकाला ‘नितीन राऊत’ व्हावे लागेल. तरच करोना पळून जाईल. अन्यथा अवघड आहे. आपल्याला करोना सोबतच जगण्याची पाळी येऊ शकते.