पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

Analysis Maharashtra News Politics

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे नेतृत्व करावे   असे  संजय राऊत  अलीकडे सारखे  बोलत आहेत. कालचे त्यांचे वक्तव्य  त्यांना महागात पडू शकते.   प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून   नाराजी बोलून दाखवली.  ज्या गोष्टीचा संबंध नाही त्या बोलू नये अशा शब्दात पटोले यांनी   राऊत यांना  झापले.                  सध्या सोनिया गांधी युपीएच्या  अध्यक्ष आहेत.  त्यांना  बदलवण्याची भाषा  गांधीभक्तांना कशी आवडेल?  पण खरेच  संजय काय चुकीचे बोलले?  युपीए विकलांग आहेच.  तिच्या अध्यक्षाची पार्टी म्हणजे कॉन्ग्रेस  मरणासन्न आहे.  सोनिया गांधी ७४ वर्षे वयाच्या  झाल्या आहेत. तब्येत चांगली नसते.  परंतु  यूपीएच काय कॉंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांना सोडवत नाही.  कुणी आठवण करून दिली  तर आमच्या पाठिंब्यावर  सरकार आहे  हे विसरू नका असा दम   दिला जातो.  सोनिया नाहीत तर मग कोण?  राहुल तयार नाहीत.   ८० वर्षे वयाचे शरद पवार ही चांगली शिफारस आहे. पण त्यांच्याकडे विश्वासार्हता नाही.  पवार कधी कुठे पलटी मारतील याचा भरवसा नाही.  पवारांच्या पोटात काय आणि मनात काय हे  कोणीही सांगू शकत नाही. पवारांचा हा  स्वभाव आजचा नाही. त्यामुळेच   त्यांना पंतप्रधानपद  चकवा देत आले.  आता संजय  बोलताहेत म्हणजे त्यांची  पवारांशी चर्चा  झालीच  असेल.  बंगालमध्ये दीदीच्या प्रचाराला पवार जात आहेत. चांगली गोष्ट आहे.  विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे. पण पवारांच्या मनात  काय?  पवारांनी ते आधी ठरवावे. त्यांना राष्ट्रपती व्हायचे  आहे की युपीएचे अध्यक्ष व्हायचे आहे? पुढच्या वर्षी जुलैमध्ये  राष्ट्रपतीची निवडणूक आहे.  नरेन्द्र मोदींच्या डोक्यात  कुठले नाव आहे त्याची कल्पना नाही.  रामनाथ कोविंद  यांचे नाव देशाने कधी ऐकले होते काय?  मोदींचे हे धक्कातंत्र आहे.  मोदी वेळेवर  पवारांचे नाव  घेऊ शकतात.  गुरु-शिष्याचे नाते आहे. तसे झाले तर  पवार नाही म्हणणार नाहीत.  राष्ट्रपती व्हायला कोणाला आवडणार नाही? तसेही त्यांचा राष्ट्रवादी पक्ष  ५०-६० जागांच्या वर  जात नाही असा आतापर्यंतचा इतिहास आहे. वारसा सांगायला सुप्रिया सुळे आहेतच.

0 Comments

No Comment.