आशाताई, तुम्ही १०० वर्षे गात राहा

Analysis Entertainment
Spread the love

पुरस्कार म्हातारपणीच का दिल्या जातात?  प्रत्येकाला हा प्रश्न  सतावतो.   आशा भोसले यांनाही  हा प्रश्न  सतावून गेला.  वयाच्या ८९ व्या वर्षी  आशाताईना  राज्य सरकारचा  २०२० या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’  पुरस्कार जाहीर झाला आहे.  त्यांची मोठी बहीण ‘भारतरत्न’ लतादिदीला २४ वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षी हाच पुरस्कार मिळाला होता. लता आज ९१ वर्षांच्या आहेत. पण ह्या दोघींना  वय  आडवे येत नाही. चिरतरुण आवाजाची दैवी देणगी  लाभली आहे. अशी माणसे कधी म्हातारी होत नसतात.   पहाट  कधी शिळी असते का?  आशाताई  तर नेहमी म्हणतात, ‘माझे वय आकड्यावर नाही, माझ्या मनावर आहे.   वय म्हणजे फक्त आकडे असतात. दुसऱ्यांना हसवत ठेवायचं आणि आपण रडायचं नाही. आयुष्याकडे पाहण्याचा किती सुंदर दृष्टीकोन आहे.’  म्हणूनच की काय  वयाचा फरक  त्यांच्या गाण्यावर  झाल्याचे दिसत नाही.   या वयातही त्या गातात,  कार्यक्रम करतात. ही ऊर्जा म्हणजे शेवटी काय असते? समाजाचा हा ऑक्सिजन  आहे.

                आज आशाताईची विदेशात अनेक हॉटेले आहेत. तीन मुले आहेत.  पण सुरुवातीचे  आयुष्य संघर्षात गेले.  अतिशय कठीण दिवस  मंगेशकर कुटुंबाने पाहिले आहेत. ही पाच भावंडे. लहानपणीच वडील म्हणजे दिनानाथ गेले.  त्यामुळे घर चालवायची सारी जबाबदारी  लहान्या लतावर  येऊन पडली.  आईचे दागिने विकून  खाण्यासाठी सामान आणावे लागायचं. गळ्याच्या जोरावर त्यांनी दिवस काढले.  आशाताईने वयाच्या १० व्या वर्षी पहिले गाणे गायिले.  वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे गणपतराव भोसले  यांच्याशी लग्न झालं. ते  फार टिकलं नाही.  पुढे आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांनी लग्न केले.  खूप संकटे पाहिली. पण  हार मानली नाही.  बहिणीशी टक्कर होती.  स्वतःची ओळख  तयार करण्यासाठी त्यांना खूप झगडावे लागले.  गायिका खूप आहेत. पण  यांच्या आवाजातला खट्याळपणा  दुर्मिळ.  त्यामागे त्यांची तपश्चर्या  आहे. रियाज आहे. गेली ७० वर्षे त्या गात  आहेत.  हजारावर सिनेमांमध्ये त्यांची गाणी आहेत.  मंदिरातली गाणी आहेत तशी डान्स बारमधली गाणीही आहेत.    वयाच्या ६९ व्या वर्षी   त्यांनी ‘खल्लास’ असे काही गायिले आहे की  त्या म्हाताऱ्या झाल्या यावर विश्वास बसत नाही.   फार  कमी लोकांना ठाऊक असेल. त्यांना स्वयंपाकही सुंदर  येतो.   अनेक जण  त्यांच्या हातच्या डिश खाऊन तृप्त झाले. असा हा चैतन्याचा झरा आहे.  त्या अवतीभवती असल्यावर  गप्पा, किस्से, नकला, गाणी, आठवणी यांना तुटवडा नसतो.  अशा ह्या मराठमोळ्या आशाताई  आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत.  त्यांनी आयुष्याची  सेंच्युरी मारावी अशी शुभेच्छा  देऊ या. त्यांचे एखादे गाणे ऐकून  दिवस फ्रेश करू या.

 230 Total Likes and Views

0 Comments

No Comment.