नागपूर बनले क्राईम कॅपिटल?

Maharashtra News Politics

नागपूरचे महापौर भाजप नेते संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याने खळबळ आहे. कुटुंबीयांसह वाढदिवसाची पार्टी करून मध्यरात्री घरी परतताना त्यांच्या कारवर दोघा बाइकस्वारांनी गोळ्या झाडल्या. जोशी बचावले. पण ३५ लाख लोकसंख्येचे नागपूर रक्तबंबाळ आहे. २४ तास उलटूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे तपास दिला आहे. विधिमंडळातही आमदारांनी हा विषय मांडताना चिंता व्यक्त केली. सरकारने नेहमीचे ठोकळेबाज उत्तर दिले. त्याने प्रश्न सुटणार नाही.

नागपूरची गुन्हेगारी ह्या एका हल्ल्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सरकार कबूल करणार नाही; पण नागपूर ही राज्याची उपराजधानी केव्हाच गुन्ह्यांची राजधानी झाली आहे. विधिमंडळ अधिवेशनानिमित्ताने सरकार आणि राज्यभरातले पोलीस अधिकारी बंदोबस्ताला असताना गुन्हेगारांची नागपूरच्या पहिल्या नागरिकावर गोळ्या झाडण्याची हिंमत होते याचा अर्थ गुन्हेगारांना कोणाचा धाक राहिलेला नाही. कोणतेही सरकार येवो, गुन्हेगारांना फरक पडत नाही. संदीप जोशी टार्गेट का झाले हे अजून बाहेर आलेले नाही. संदीप जोशी हा नागपूरचा भविष्यातला चेहरा आहे. अभ्यासू, सुसंस्कृत, कल्पक नेतृत्व देऊन त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. राज्याला त्यांच्याकडून खूप अपेक्षा असताना त्यांचा गेम कुणाला हवा होता? गेल्याच महिन्यात ते महापौर झाले. त्यानंतर त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यांना धमक्याही आल्या होत्या. पोलिसांनी त्या किती गांभीर्याने घेतल्या?

महापौरच सुरक्षित नाही तिथे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावणे साहजिक आहे. नागपूरला कुणाची बोहरी नजर लागली? गुन्हेगारी सर्वत्र असते. पण अलीकडच्या गुन्हेगारीची दहशत वेगळी आहे. बदललेले सामाजिक जीवन गुन्हेगारीची नवी संस्कृती जन्माला घालत आहे. एकेकाळी नागपूर अंधार पडताच झोपी जात असे. अलीकडे रात्री नऊनंतर दिवस उजाडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्वी गस्तीच्या जोरावर पोलिसांची कॉलर टाईट असे. अलीकडे गस्तीची दहशत संपल्याने समाजकंटकांना रात्र मोकळी झाली आहे. नागपुरात गडकरी, फडणवीस राहतात तसे संतोष आंबेकरसारखे कुख्यात डॉनही राहतात. पापाचा घडा भरेपर्यंत ते मोकाट का असतात? पोलीस डोळे मिटून दूध का पितात? त्यामुळे आव्हान मोठे आहे. पण आज स्वतंत्र गृहमंत्रीच नाही. वेगळा गृहमंत्री देण्याची घाई ज्या सरकारला वाटत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

0 Comments

No Comment.