खातेवाटपाची भांडणे संपली नाहीत

Business News Others
Spread the love

सत्तास्थापनेच्या १५ दिवसानंतर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले खरे. पण तिढा सुटलेला नाही. गृह आणि नगर विकास खात्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खूप रस्सीखेच आहे. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर कलह टाळण्यासाठी तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले. महाआघाडीच्या सारे आलबेल नाही. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कलह भडकेल.

जयंत पाटील यांचे समर्थक गृह खाते सोडायला तयार नाहीत आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते ह्या दोन्ही जागांवर डोळा आहे. गृह आणि नगर विकास ही दोन्ही मलईदार खाती शिवसेनेकडे देण्यात आली असली तरी ती तात्पुरती व्यवस्था आहे असे राष्ट्र्वादीतलेच ज्येष्ठ नेते म्हणत आहेत. त्यामुळे खातेवाटप हे गौडबंगाल बनले आहे. नेमके काय सुरु आहे हे कुणाला कळायला मार्ग नाही. रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती आहे की उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे तेही कळेनासे झाले आहे.

गृह, नगर विकास आणि महसूल ह्या तीन खात्यांचे वाटप तीन पक्षांमध्ये करण्यात येईल असे सत्तास्थापनेच्या वेळी ठरले होते. मात्र आता दोन्ही खात्यांवर अजितदादांनी दावा ठोकला आहे. अजितदादांना तूर्त मंत्रिमंडळाबाहेर ठेवून शरद पवारांनी गेम खेळला आहे. पण मनासारखे झाले नाही तर दादा पुन्हा अज्ञातवासात जाऊ शकतात. त्यामुळे थोरले पवार हेही सध्या टेन्शनमध्ये आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बिनधास्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठलेही खाते घेतलेले नाही. आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्यासह अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली होती. पण इथे कुठलेही खाते न घेता उद्धव सर्व खात्यांवर लक्ष ठेवायला मोकळे झाले आहेत. हा मास्टरस्ट्रोक आहे. शिवसेनेकडे तब्बल २२ खाती खेचून उद्धव यांनी राष्ट्रवादीला जमालगोटा दिला.

एकनाथराव शिंदे यांना सर्वात शक्तिमान मंत्री बनवले. मुख्यमंत्र्याला १८-१८ तास काम करावे लागते. उद्धव यांच्या नाजूक तब्येतीला एवढा ताणतणाव अवघड आहे. त्यामुळे उद्धव यांनी हा मधला मार्ग काढला असावा. पण सरकारवर उद्धव यांना अजून म्हणावी तशी पकड मिळवता आलेली नाही. दोन्ही काँग्रेसमधील कुरघोड्यापायी उद्धव त्रासले असणार. वर्ष-दोन वर्षे ह्या सरकारने काढली तरी भक्कम झाले अशी कुजबुज आहे.

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

 161 Total Likes and Views

0 Comments

No Comment.