करोना लशीचे राजकारण

Analysis Others
आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते. जगभर थैमान घालणारा कोरोना त्यातून कसा बचावणार? कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या दोन लशीच्या आपत्कालीन वापराला  नुकतीच मान्यता मिळाली आहे.   यातल्या एका, भारत बायोटेकच्या लसीला  मिळालेल्या मंजुरीबाबत  कॉन्ग्रेसच्या काही   नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या  नाहीत, तसेच   लशीच्या प्रभावीपणाबद्दलची  पडताळणी झालेली नाही. असे असताना तिचा वापर धोकादायक ठरू शकतो असे शशी थरूर, आनंद शर्मा ह्या नेत्यांनी म्हटले आहे.  समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी तर ही भाजपची लस असल्याने आपण ती  घेणार नाही असे जाहीर केले.  भाजपच्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू शकतो असा त्यांचा सवाल आहे.  भक्कम तयारीनंतरच  लसीकरण करावे ही ह्या नेत्यांची चिंता समजू शकते. पण भाजपच्या काळात  लस तयार झाली म्हणून ती  घेणार नाही असे म्हणणे हा शुध्द बालीशपणा आहे.  रक्ताला जसा पक्ष नसतो. तसे लशीलाही  पक्ष नसतो.  शेवटी शास्रज्ञ ती  बनवतात.  त्यात राजकारण्यांचे डोके नसते. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणाऱ्या  नेत्यांना काय कळणार? लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

               औषध महानियंत्रकाने मंजुरी दिलेल्या दोन्ही लशी स्वदेशी आहेत.  त्याचा अभिमान असला पाहिजे. ‘कोव्हिशिल्ड’ नावाची लस पुण्याच्या सिरम इंस्टीट्युटने बनवली आहे. ‘कोव्ह्याक्सिन’ ही  दुसरी लस हैद्राबादच्या भारत बायोटेकची आहे. कोरोना विषाणूच्या साथीने भारतात एक लाखावर लोकांचा जीव घेतला आहे. त्याच्यावर औषध नाही. म्हणून सारे हैराण  होते.  प्रतिबंधक औषधी   देऊन  आपले डॉक्टर   रोग्यांचा जीव वाचवण्याची धडपड करीत आहेत.  त्यांच्या मदतीला आता लस आली आहे. करोनावरील उपचारांच्या रुपात   ही लस आशेचा नवा किरण घेऊन आली आहे.  येत्या काही आठवड्यात  लसीकरण सुरु होईल.  प्रत्येकाला दोन डोस  द्यायचे आहे. पहिल्या डोसनंतर  महिन्याच्या अंतराने दुसरा डोस द्यायचा आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि गरजूंना ती टोचली जाणार आहे.   तिने काय फायदा होतो ते  सावकाश कळेल. त्या आधीच  शंका घेणे चुकीचे आहे.  ही लस म्हणजे बुलेटप्रुफ जाकीट  नाही, पण सुरक्षाकवच नक्कीच आहे.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे महत्वाचे आहे. लस घेतली म्हणजे आपण मोकळे असेही समजण्याचे कारण नाही.  प्रत्येकाला काळजी घ्यायचीच आहे.   लस घेतल्यानंतरही  करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करायचे  आहे. मास्क घालायचाच आहे. हात धुवायचेच आहेत.  ‘दवाई भी, कडाई  भी’  असा नवा मंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे. करोना रुग्णांची संख्या घटत आहे  याचा अर्थ लोकांनी निर्धास्त व्हावे असा नाही.  करोना  छुपा रुस्तुम आहे. कधीही उलटू शकतो. 

     देशातील वैद्यकीय तज्ञांनीही  गैरसमज नको  असे बजावले आहे.  तज्ञांनी म्हटले आहे की,   रुग्णाला साधे औषध देतानाही डॉक्टर  अनेकदा विचार करतात.  इथे तर कोरोनाचा मामला आहे.  त्यामुळे संबंधित  यंत्रणा बेफिकिरी बाळगतील का? रात्रंदिवस जागून अवघ्या वर्षभराच्या आत त्यांनी लस बनवली हे खरे तर अभिमानास्पद आहे. आपल्याकडे देवी, पोलिओ आदी आजारावर लस दिल्या गेल्या आहेत.   त्यावेळी  लोकांच्या मनात    शंका नव्हत्या.  विश्वासाने लोकांनी लस टोचून घेतल्या. तसेच आता वागायचे आहे. साईड इफेक्ट आले तर    उपचाराची सुविधा आहे.  रुग्णाला वाऱ्यावर सोडून दिले जाणार नाही. आयएमएचा एक पदाधिकारी तर म्हणाला,  ज्यांना भीती वाटते, शंका आहे त्यांनी पुढच्या टप्प्यात  घ्यावी.  मात्र, लस घेणे टाळू नये.  कोरोनाला संपवायचे असेल तर लसीकरण योग्य प्रकारे व्हायला हवे.  आणि इथेच खरे आव्हान आहे.  भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. इतक्या लोकांना टोचण्यासाठी काही वर्षे लागतील. सध्या आपल्याकडे फक्त आठ कोटी लस तयार आहेत.    आरोग्य कर्मचारी आणि करोना योद्धे  मिळून एकूण ३ कोटी लोकांना  सर्वात आधी लस द्यायची आहे.   ही मोफत असेल.  नंतरच्या टप्प्यात    ५० वर्षावरील लोकांना तसेच गंभीर आजारी रुग्णांचा नंबर लागणार आहे. यांची संख्या २७ कोटी आहे.  सामान्य जनतेला ही लस किती रुपयात पडेल  हे अजून ठरलेले नाही.  पाहूया काय होते ते. 
0 Comments

No Comment.