राष्ट्रवादी कॉन्ग्रेस सध्या अडचणीत आहे. तिचा एक मंत्री बाईच्या भानगडीत तर दुसऱ्या मंत्र्याचा जावई अमली मामल्यात अडकला आहे. दबंग मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दुसरे एक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ विक्री व दलालीप्रकरणी ‘एनसीबी’वाल्यांनी अटक केली आहे. महत्वाचे दोन-दोन मंत्री घेऱ्यात आल्याने राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवारही हादरले आहेत. महाआघाडीचे सरकार पडावे यासाठी वर्षभरापासून देव पाण्यात बुडवून बसलेल्या भाजप नेत्यांना हा आयता विषय मिळाला आहे. भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काहीही होणार नाही. लोकलाजेस्तव राजीनामा घेतला तरी काही महिन्याने पुन्हा आणले जाईल. आजतरी ह्या निमित्ताने राजकारण तापले आहे.
अलीकडे राजकारणाचा स्तर कमालीचा घसरला आहे. घाणेरडे झाले. ह्यापेक्षा गुंड मवाली बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. चांगले लोक राजकारणात येत नाहीत म्हणून दुर्जनशक्तीचे फावते आहे. एका मुंडेवरून गरमागरमी सुरु आहे. पण मुंडे एकच आहे का? मुंडेगुंडे सर्वच पक्षात आहेत. भाजपकडे ‘मुंडे’ नाहीत का? दोन नव्हे तर तीनचार महिला ‘सांभाळणारे’ पुढारी सर्वच पक्षात डझनाने आहेत. काहींनी तर प्रत्येक जिल्ह्यात ‘व्यवस्था’ ठेवली आहे. मुंडे म्हणतात तशा ‘परस्पर सहमतीच्या संबंधा’चा हा फॉर्म्युला आहे. त्या महिलेचे खाण्याराहण्यापासून संपूर्ण पुनर्वसन पुढारी करतो. त्यामुळे संसाराचे हे ‘समांतर सरकार’ धोक्यात येत नाही. पूर्वी राजेमहाराजे ‘अंगवस्त्र’ ठेवायचे. आजचे पुढारी राजामहाराजापेक्षा कमी नाहीत. येथे मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीची तक्रार नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’ दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने केला आहे. मुंडेंनी ‘व्यवस्थापनात’ मार खाल्ला असे जाणवते. काहीही असो, आपल्याकडे असेल तर तो चांगला आणि बाहेर गेला तर वाईट असे कसे चालू शकते? बरखा प्रकरणाने गोपीनाथ मुंडेंचा चांगलाच पिच्छा केला होता. त्यांचा हा पुतण्या आठ वर्षापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आला म्हणजे पवित्र झाला का? धनंजयचा मामला गंभीर आहे ही गोष्ट शरद पवार कबूल करतात. पण त्याला घरी बसायला सांगत नाहीत. जनतेमध्ये काय सिग्नल जातो? मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खाते आहे. किमान त्या खात्याशी तरी न्याय करा. त्या महिलेने केलेले आरोप आणि मुंडे यांनी केलेला खुलासा दोन्हीही धक्कादायक आहेत. कुठल्या समाजव्यवस्थेत आपण वावरत आहोत? बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या ह्या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शोषण आणि तेही तब्बल १४ वर्षे. बॉलीवूडमध्ये काम देतो अशा बहाण्याखाली हे सारे झाले असा आरोप आहे. मात्र आता ती पोलिसात गेली. मुंडे मात्र हे सारे खोटे असल्याचे सांगत आहेत. पैसे उकळण्यासाठी ती मला बदनाम करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ह्या निमित्ताने मुंडे यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट बाहेर आली. मग झगडा ‘न झालेल्या तिसऱ्या लग्नाचा’ आहे का? ‘१७ वर्षापासून परस्पर सहमतीने आपण संबंधात होतो, हिच्यापासून झालेल्या दोन मुलांना सांभाळतही आहे आणि माझ्या पहिल्या पत्नीला व मित्रपरिवाराला हे ठाऊक आहे’ असे मुंडे म्हणतात. मुंडेंच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय नाही. पण पहिली पत्नी असताना दुसरीसोबत राहण्याची त्यांना कोणत्या कायद्याने परवानगी दिली? सामाजिक न्याय मंत्रीच असे वागू लागला कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची? इश्यू तोही नाही. मुंडेंची भानगड अचानक कशी बाहेर आली? हा सर्जिकल स्ट्राईक कोणाचा? अजितदादांची संगत केल्याची शिक्षा तर काका देत नाहीत ना? शरद पवारांच्या मनात नेमके आहे तरी काय?