लवकरच तुमच्या मोबाईलवर कॉलर ट्यून येईल…धीरगंभीर आवाजात अमिताभ बच्चन म्हणेल, ‘महागाई एक आजार आहे. तो टाळा. जेवण कमी करा. फाटलेले कपडे घाला. पायी चाला. पेट्रोल वापरू नका. लक्षात ठेवा. आपल्याला महागाईसोबत लढायचे आहे, सरकारसोबत नाही.’ महागाईचे कोरोनासारखे झाले आहे. जायला तयार नाही. महागाई पिच्छा सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल सेंच्युरी मारत आहे. स्वयंपाकाचे सिलिंडर ८०० रुपयांवर गेले आहे. किराणा डबल महागला आहे. कोरोनामुळे १२ कोटी नोकऱ्या बुडाल्या असताना महागाईच्या दणक्याने सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. रोज खायची भाजीही २० रुपये पावाखाली नाही. आता बोला. लोक १० रुपयाची भाजी घेतात. पण भडकत नाहीत. महागाई कमी करतो असे सांगून नरेंद्र मोदी सत्तेत आले. आता तर ते महागाईचा विषयही काढत नाहीत. मोदिभक्तीचा सेन्सेक्सही कायम आहे. तुम्ही पहा. कुठेही लोकांचे आंदोलन नाही. छुटफुट आंदोलनं होतात. त्यांना कुणी गंभीरपणे घेत नाही. असं का होतंय? महागाईची लोकांना सवय झाली की काय?
जुने दिवस आठवा. महागाई वाढली की लोक रस्त्यावर यायचे. अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत आले होते. मृणाल गोरे लाटणे मोर्चा काढायच्या. रिकामे सिलेंडर घेऊन विरोधक माहोल बनवायचे. भारत बंद पुकारला जायचा. रामदेवबाबा म्हणायचे, स्वस्ताई आणायची असेल तर मोदींना आणा. ‘बहुत हो गई महगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ असे नारे सहा वर्षापूर्वी लागत होते. मोदी आले. पण अच्छे दिन दूर गेले… पण एक मोर्चा नाही. कुठलेही आंदोलन नाही. जनता मुर्दाड झाली आहे का?
पेट्रोल-डिझेल महागले, की साऱ्या गोष्टी महागतात. पण कोण लक्षात घेतो? कॉन्ग्रेस असो की भाजप, प्रत्येकाच्या राज्यात पेट्रोल महागले आहे. गेल्या सात वर्षात २१ रुपयाने पेट्रोल महागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त असल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. पण कच्च्या तेलाच्या किंमती पडत असतानाही लोकांचा खिसा कापला जात होता, त्याचे काय? मोदी येण्याच्या थोडे आधी म्हणजे मनमोहन यांच्या राज्यात जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर सर्वात जास्त म्हणजे १०८ डॉलर होते आणि तेव्हा पेट्रोलचा आपल्याकडे भाव होता ७१ रुपये लिटर. आज क्रूड ऑइलचा दर कमी म्हणजे ६२ डॉलर्स आहे. पण आपल्याला ९० रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकत नाही का? कसे होईल? दुभती गाय म्हणून पेट्रोल-डिझेलकडे पाहण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वृत्तीमुळे पेट्रोल महागते. सरकारला पैसा हवा आहे. त्यामुळे सरकार वेगवेगळे कर लादून पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ देत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही. पण सांगतो. पेट्रोलची मूळ किंमत फक्त ३० रुपये लिटर आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र-राज्य सरकारचे मिळून ६०-६५ रुपयाचे कर आहेत. पंपचालकाचे कमिशन लिटरला चार रुपये जाते. म्हणून आपल्याला पेट्रोल नव्वदीपार मिळते. डिझेलचेही तसेच. डिझेलची मूळ किंमत २९ रुपये आहे. त्यावर ५०-५५ रुपये करापोटी द्यावे लागतात. ह्या विषयातले गाढे तज्ञ आणि नामवंत पत्रकार सोपान पांढरीपांडे यांच्या मते, पेट्रोल आज ६० रुपये भावाने मिळाले पाहिजे.
तेल कंपन्या सरकारी आहेत. तरीही त्या नफेखोरी करतात. सरकारकडे आर्थिक धोरणच नाही. त्यामुळे सारे वांधे आहेत. मुख्य मुद्दा हा आहे, की एवढे कर आम्ही का मोजावे? पूर्वी आंदोलने व्हायची. सरकार दबावात यायचे. आज कसे चिडीचूप आहे. लढायला वेळ आहे कुणाला? जगण्याच्या लढाईतच दमछाक सुरु आहे. त्यामुळे सरकारचे फावते आहे.